
केज /प्रतिनिधी
केज दि.26 : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आता सोळा दिवस उलटले असून अद्याप काही आरोपींना अटक केलेली नाही. जे आरोपी खुनात आहेत, तेच आरोपी खंडणीत आहेत. या आरोपींचे सीडीआर काढावेत, यात पोलीसांचेही काय लागे-बांधे आहेत, हे नवीन एसपींनी तपासावे. आता काही पुढारी प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा म्हणतात, परंतु हे करण्यासाठी आधी तपास फास्ट करा आणि प्रकरणाच्या खोलात जाऊन सर्व आरोपींना फाशी द्या, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दरम्यान, दि.२८ डिसेंबर रोजी बीड येथे होत असलेल्या मोर्चातही आपण सहभागी होत असल्याचे ते म्हणाले खा.बजरंग सोनवणे यांच्या पवनसुत या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. दि.९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याआधी पवनचक्की परिसरात गार्डला मारहाण केली म्हणून संतोष देशमुख सरपंच या नात्याने त्याठिकाणी गेले. परंतु हाच राग मनात धरून देशमुख यांची निघृन हत्या केली. सदरील भांडणाच्या दिवशी कंपनीचा सुरक्षा गार्ड गुन्हा दाखल करायला गेला होता, परंतु त्याचा पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. यावेळी पोलीसांना कोणाचा फोन आला. पोलीसांचे कोणासोबत लागेबांधे आहेत, याचा तपास झाला पाहिजे, यासाठी या प्रकरणाशी संबधितांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत. साध्या प्रकरणात पोलीस आरोपी सापडत नसल्यास त्याच्या घरी जावून चौकशी करतात, सीडीआर काढतात. लोकसभा निवडणूकीत देखील याच पोलीसांनी सालगडी असल्यासारखे सत्ताधारी मंडळींचे काम केले.आमचे सीडीआर काढले, मग आता सीडीआर का काढले जात नाहीत. गुन्हा घडून सोळा दिसत झाले तरी आरोपीला अटक का केली जात नाही. पोलीसांनी दोन दिवसात आरोपींना अटक करू, असे म्हटले होते. परंतु शब्द देवूनही त्यांनी शब्द पाळला नाही. लोकांनी पोलीसांवर विश्वास ठेवला ही काय चुक आहे का. जिल्ह्यात सत्तेचा वापर करून कायदा व सुव्यस्था बिघडविण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणूकीत बंदुकीने हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींनीच माधव जाधव यांना मारहाण केली. त्यावेळी असलेल्या पोलीस गार्डने गुन्हा का दाखल केला नाही. परळीतील यशवंत देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा कोणी दाखल केला. पाटोद्याचे रामकृष्ण बांगर यांनी यांचे काय वाईट केले होते, त्यांचे घर उध्वस्त करण्याचे काम कोणी केले. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचा कळस झालेला असून देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी पालकमंत्री चांगला असणे आवश्यक आहे. आता पालकमंत्री कोणाला करायचा हा त्या पक्षांचा प्रश्न आहे परंतु माझी इच्छा अजीत पवार यांनीच पालकमंत्री स्विकारावे, अशी आहे, असे म्हणत दि.२८ डिसेंबर रोजी आरोपींच्या अटकेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात मी सहभागी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी ही आपली जबाबदारी आहे, या भावनेतून यावे, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.
