
केज दि18 (अमोल सावंत)स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ
इंडिया अंतर्गत सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या महिला खेळाडूंना थेट वर्ग एक पदी नियुक्ती देण्यात येत असे. परंतु मागील दहा वर्षात अशी नियुक्ती दिलेली नाही. यापुढे लाडली बहन म्हणून पात्र महिला खेळाडूंना प्रशासनात थेट नियुक्ती द्यावी, अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी मनसुख मांडविया, केंद्रीय क्रीडा मंत्री व रक्षा खडसे, क्रीडा राज्यमंत्री यांना निवेदनाव्दारे केली आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना भेटून दिलेल्या निवेदनात
म्हटले आहे कि, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील सलग तीन वर्ष फुटबॉल खेळलेल्या महिला खेळाडू राज्यांचे व देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या मेहनतीने खेळतात. या महिला खेळाडूंच्या योगदानाला मान्यता मिळावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी लाडली बहन खेळाडू म्हणून पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
त्या अनुषंगाने, सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या महिला खेळाडूंच्या लाडली बहन म्हणून थेट भरतीसाठी धोरण तयार करावे. केंद्रीय किंवा राज्य सरकारमध्ये त्यांना वर्ग-१ च्या नोकऱ्या देऊन त्यांच्या मेहनतीला योग्य न्याय द्यावा, यामुळे त्यांच्या योगदानाचा सन्मान होईल. तसेच भविष्यात अधिकाधिक महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रेरणा मिळेल. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि त्याची तातडीने अंमल बजावणी करावी, असेही म्हटले आहे. यावेळी राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ही मागणी अतिशय चांगली असून आपण लवकरच याबाबत निर्णय घेवू, असे आश्वासन देखील दिले. एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवर सलग तीन वर्षे खेळलेल्या खेळाडूंची संख्या ५० च्या घरात आहे. खा. सोनवणे यांनी केलेल्या मागणीनुसार निर्णय झाल्यास देशातील लाडक्या बहिनींना याचा मोठा फायदा
होणार आहे.
